आजच्या इन्स्टन्ट जीवनात आयुर्वेद
कालबाह्य झाला आहे काय ॽ
आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र असल्यामुळे ते कालबाह्य झाले आहे असे मानणारा वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ मानला जाणारा एक वर्ग सममाजामध्ये आहे. या मानसिकतेच्या पाष्र्वभूमीवर आयुर्वेदाच्या सद्यकालीन उपयोजितेचा उहापोह या लेखात करण्यात येत आहे. चिकित्सा शास्त्राची सुरूवात मंत्रयुगाने होऊन आज त्याने तंत्रयुगांत प्रवेश केला आहे. या तंत्रयुगामध्ये एकीकडे जीवाणु संसर्गजन्य व्याधींची जागा सुखासीन आहार आणि जीवन शैलीशी संबंधित रोगांनी घेतली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरीकांची संख्यावाढल्यामुळे जीर्ण व्याधींचे प्रमाण वाढलेले दिसते आहे. संसर्गजन्य रोग सामान्यतः प्रतिजैविकादि औषधे सेवन करून कांही दिवसात बरे होणारे असतात. बिघडलेल्या आहार व जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या व्याधीने एकदा शरीरांत प्रवेश केला की तो त्या शरीराची साथ त्याच्या मृत्युबरोबरच सोडतो. हे रोग कोणत्याच औषधाला जुमानत नाहीत. बिघडलेली आहार व जीवनशैली सुधारून ती रूळावर आणणे हा त्यावरील मूळ उपाय आहे. पण आधुनिक वैद्यक शास्त्राच्या चिकित्सा सूत्रांत औषधाशिवाय अन्य उपायांना अत्यंत गौण स्थान आहे. याउलट आहार आणि जीवनशैली चिकित्सा हे आयुर्वेद चिकित्सा सूत्राचे बलस्थान आहे. अशा प्रसंगी आयुर्वेद उपचार पद्धती योग्य रीतीने वापरल्यास कांही प्रसंगी समर्थ पर्याय तर नेहमीच पूरक चिकित्सा सिद्ध होऊ शकते. हे निश्चित.
----------------X--------------------------
कुरूक्षेत्राच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णाने स्वतःचे तोंड उघडून त्यांत अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवले होते असे म्हटले जाते. हजारो वर्षापूर्वीच्या महाभारत कालातील हा प्रसंग आहे. लौकिकार्थाने विश्वरूप दर्शन दर्शनासाठी आज आपल्याला कुणा भगवान श्रीकृष्णाची गरज पडत नाही. संगणकाचे सामान्य ज्ञान असलेला कुणीही ऐरागैरा माणूस त्याच्या एका बोटाच्या टोकाने क्लिकने त्याच्या हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर जिथे असेल तिथून इंटरनेटचे दार उघडून संपूर्ण जग कांही क्षणांत पाहू शकतो. अशा या झटपट इन्स्टन्ट युगात आयुर्वेद कालबाह्य झाला आहे असे मानणारा
ज्याला सर्वार्थाने सूज्ञ म्हणावे असा एक मोठा वर्ग आहे. त्यातच एकीकडे आयुर्वेदिक औषधाला साईड इफेक्ट्स नसतात. तर दुसरीकडे आयुर्वेदिक औषधामध्ये मर्क्युरी, लेड, कॅडमियम सारखे टॅाक्सिक मेटल्स असतात त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे किडनी, लिवर खराब होते. आयुर्वेदिक औषध दीर्घकाल सेवन करावे लागते. त्याने रोग लवकर बरे होत नाहीत. त्यासाठी खूप पथ्यपाणी करावे लागते. यासारखे अनेक समज लोकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. यातील कांही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर तर मोठ्या प्रमाणातील समज ऐकीव माहितीवर आधारित आहेत. उपरोक्त गोष्टी ख-या खोट्या कशाही असल्या तरी आज भारतात आयुर्वेदाला कायदेशीर मान्यता आहे. 2025 अखेरीस भारतात सात लाखापेक्षा अधिक नोंदणीकृत आयुर्वेद व्यावसायिक कार्यरत आहेत. यातील दीड लाख व्यावसायिक महाराष्ट्रात आहेत. या तथ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे या लाखो आयुर्वेद पदवीधरांकडून आयुर्वेद उपचार करून घ्यावेत की नाही आणि घ्यायचे असतील तर ते कोणत्या परिस्थितीत असे प्रश्न समाजाला पडणे साहजिक आहे. या प्रश्नान्चे उत्तर देणे हेच या लेखाचे प्रयोजन आहे.
व्याधी प्रादुर्भावाचा बदललेला
कल
आज संपूर्ण जगातील व्याधी प्रादुर्भावाचा कल म्हणजेच डिसिज बर्डन ट्रेंड पूर्णपणे बदललेला दिसून येत आहे. आरोग्य सेवांची वाढलेली व्याप्ती तसेच प्रतिजैविके म्हणजे अॅंटिबायोटिक्सच्या सहज वापरामुळे आज सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव नष्ट नाही तरी खूपच कमी झाला आहे. त्यामुळे सांसर्गिक रोग ही कांही आता समस्या राहिलेली नाही. दुसरीकडे देशातील अतिदुर्गम भागांत कुपोषणजन्य विकार कांही प्रमाणात दिसत असले तरी शहरी जीवनात मात्र ओव्हर न्युट्रीशन म्हणजे अतिपोषणाच्या परिणामी अतिस्थौल्य म्हणजे ओबेसिटी, मधुमेह, हृदय रोग, रक्तदाब वृद्धि, मेटॅबॅालिक सिण्ड्रोम, आॕटो इम्युन डिसिज यासारख्या आयुर्वेदाच्या भाषेतील संतर्पणजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून तो दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर चाललेला दिसून येत आहे. त्याचे कारण या प्रकारचे रोग पूर्ण बरे करू शकेल असे कोणतेही औषध आजच्या लोकमान्य अॅलोपॅथि चिकित्सा पद्धतीकडे उपलब्ध नाही. खरे तर ज्याला व्यावहारिक भाषेत टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन यासारखे औषध म्हटले जाते ते असे रोग बरे करणारे औषध कुठल्याच चिकित्सा पद्धतीकडे नाही. आणि या व्यतिरिक्त इतर उपचारांना आपला समाज औषध मानत नाही. किंबहुना
जगड्व्याळ पसरलेला बलाढ्य औषधी उद्योग त्याला तसे करू देत नाही. हा औषधी उद्योग अशा रोग्यांना
रोज नवीन नवीन निरूपयोगी महागड्या औषधांच्या मात्रा घेण्यास भाग पाडत असतो. या
बहुमोल कार्यामध्ये विविध प्रकारच्या विषय तज्ञांची फौज त्यांना मदत करण्यास तत्पर
असतेच. वास्तविक बिघडलेली आहार व जीवनशैली सुधारून ती रूळावर आणणे हा त्यावरील मूळ उपाय आहे. पण
आधुनिक वैद्यक शास्त्राच्या
चिकित्सा सूत्रांत औषधाशिवाय
अन्य उपायांना अत्यंत गौण स्थान आहे.
या परिस्थितीत आयुर्वेद हा अत्यंत समर्थ पर्याय होऊ शकतो. पण त्यासाठी आयुर्वेद तज्ञांनी आधुनिक औषधांना पर्यायी आयुर्वेदिक औषध देण्यापेक्षा औषध
योजने पलिकडील आयुर्वेदाच्या उपचार पद्धतींचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
आयुर्वेदिक औषध पर्यायी औषध नाही
कोणत्याही आधुनिक औषधाला आयुर्वेदिक औषध पर्याय होऊ शकत नाही. पण संपूर्ण आयुर्वेद उपचार पद्धती योग्य रीतीने वापरल्यास कांही प्रसंगी समर्थ पर्याय तर नेहमीच पूरक चिकित्सा सिद्ध होऊ शकते. हे निश्चित. आयुर्वेद चिकित्सा पद्धती नव्हे तर जीवन पद्धती आहे अशी धारणा प्रचलित आहे. आयुर्वेदिक जीवन पद्धती म्हटले की सामान्यतः भल्या पहाटे ब्राह्म मुहुर्तावर उठणे आणि सद्यकाली आचरणास अव्यावहारिक वाटणा-या इतर गोष्टी आठवतात. परंतु आयुर्वेदोक्त दिनक्रमांच्या या वेळांची सद्यकालीन असंगतता बघण्यापेक्षा त्यामागील आरोग्य रक्षणाचे मूळ सूत्र लक्षांत घेतले गेले पाहिजे. या दृष्टीने केवळ पहाटे उठणे आणि रात्री लवकर झोपणे म्हणजे आयुर्वेद जीवन पद्धति नव्हे. तर आपल्या व्यावसायिक कार्यवेळांना अनुरूप दिनचर्या योजून आपला आहार आणि विहार म्हणजे इतर दिनक्रम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यास पूरक व पोषक राहील असा ठेवणे म्हणजेच आयुर्वेद जीवन पद्धति आचरणे होय. यासाठी आयुर्वेदोक्त आहार सेवनाचे नियम जे अत्यंत वैज्ञानिक आणि आजच्या शहरी जीवनांतही सहज आचरण योग्य आहेत त्यांचे एक उदाहरण मार्गदर्शक ठरेल. या आहार सेवन नियमामध्ये संबंधित व्यक्तिची शारीरिक व मानसिक अवस्था, त्याच्या पचन संस्थेची भोजन समयीची स्थिती, त्याच्या एकंदरित शरीरातील चयापचयादि प्रक्रिया, त्याच्या शरीराची ठेवण इत्यादिंना अनुरूप आहारातील घटकांची आवश्यकता यांचा विचार केला जातो. याशिवाय भोजन समयी भोजन करणा-या आणि अन्न वाढणा-या व्यक्तिच्या मानसिक अवस्थेसह त्याने पाळावयाचे स्वच्छतेचे बारिक सारिक नियम ज्यात भोजन पात्रांची स्वच्छता आणि भोजनसमयीचे सभोवताल ज्याला इंग्रजीत अॅम्बियन्स म्हणतात यांचाही समावेश होतो. कोविडच्या प्रादुर्भावापासून हात धुण्याचे महत्व आधुनिक वैद्यक शास्त्राला पटून ते लोकांच्या मनावर बिंबवण्याचे भरमार प्रयत्न केले जात आहेत. परिणामी हॅण्ड सॅनिटायजरच्या जाहिरातीतून त्यांची विक्री कैक पटीने वाढून संबंधित उद्योजकांच्या तिजो-या भरल्या जात आहेत. पण हात धुणेच नव्हे तर एकूणच वैयक्तिक स्वच्छतेचे आयुर्वेदाने अधोरेखित केलेले महत्व आजही दुर्लक्षितच राहिले आहे. वास्तविक त्यात अव्यवहार्य असे कांही नाही. आमच्या विद्यार्थी दशेत स्वस्थ वृत्त विषयातील अशा वर्णनाकडे आम्ही असल्या फुटकळ गोष्टी मेडिकलच्या विद्याथ्र्यांना सांगणे हास्यास्पद ठरवून त्याकडे दुर्लक्ष करत होतो. हे आठवले की खजील व्हायला होते. तसे पाहिले तर एकूणच आयुर्वेदाकडे एक विज्ञान म्हणून आम्ही भारतीयांनी दुर्लक्षच केले आहे. समाजमनाने त्याला एक घरगुती उपचार पद्वती किंवा आजीबाईच्या बटव्यातील औषधी एवढीच मान्यता दिली आहे.
आयुर्वेदिक
औषधांचा अज्ञानमूलक वापर घातक ठरू शकतो
आजारी पडल्यानंतर ठरवून आयुर्वेदिक उपचार घेणारी व्यक्ति आज भारतातही सापडणे तसे र्दुर्मिळ म्हटले पाहिजे. सामान्यतः एखादा आजार अॅलोपॅथी औषधाने बरा होत नाही असे लक्षांत येऊ लागले की मग लोकांना आयुर्वेदिक औषधाची आठवण येते. त्यातही आयुर्वेदिक उपचार घेतल्याने रोग बरा होईल या विश्वासापेक्षा हेही करून पाहू अशी भावना अधिक असते. म्हणूनच कॅन्सर, डायबेटिस, ओबेसिटी, सऺाधेदुखी, वंध्यत्व, पांढरे डाग, सोरियासिस सारखे त्वचा रोग, ऑटो इम्युन डिसिजेस यासारखे कधीही बरे न होणारे रोग बरे व्हावेत या आशेने लोक आयुर्वेदाकडे वळत असलेले दिसतात. असे उपचार घेतानाही आयुर्वेदाचा उपयोग पूरक उपचार म्हणूनच अधिकतर केला जात असतो. म्हणजे यातील बहुसंख्य लोक अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक अशी दोन्ही औषधे एकाच वेळी घेत असलेले आढळून येतात. बरे असे करत असल्याची माहिती त्यांच्या डॅाक्टरलाही ते क्वचितच देत असतात. अशा प्रसंगी अनेकदा एकच कार्य करणारी आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथिक औषधे एकत्र घेतली जात असतात. त्यामुळे कधी कधी त्यऺाच्या एकत्रित परिणामामुळे रूग्णाची प्रकृति अचानक बिघडते. उदा. डायबेटिसमध्ये रक्त शर्करेचे प्रमाण कमी करणा-या औषधाबरोबर आयुर्वेदिक औषध घेतल्यास कधी कधी रक्त शर्करा अचानक कमी होऊन रूग्णाला धोका होऊ शकतो. याउलट परस्पर विरूद्ध कार्य करणारी अॅलोपॅथिक व आयुर्वेदिक औषधे एकत्र दिली गेल्यास त्यांची परिणामकारकता थांबवली जाऊन परिणामी रोग बळावून आत्ययिक अवस्था निर्माण होऊ शकते. उदा. एपिलेप्सि म्हणजे अपस्मारा सारख्या विकारांत आक्षेप प्रतिरोधक अॅलोपॅथिक औषधांबरोबर जटामऺासी सारखे औषध दिल्यास अॅलोपॅथिक औषधाची आक्षेप प्रतिरोध क्षमता कमी होऊन अपस्माराचे आक्षेप अचानक सुरू होण्याची शक्यता असते. असे कांही घडले की संबंधित अॅलोपॅथिक डॅाक्टर लगेचच घडलेल्या दुर्घटनेसाठी आयुर्वेदिक औषधाला जबाबदार ठरवून संपूर्ण आयुर्वेदाला दूषणे देऊ लागतो. आणि मग संबंधित दुर्घटनेचे बळी आणि साक्षीदार हे सर्व लोक आयुर्वेदाचे कट्टर विरोधक बनतात. वास्तविक घडलेली घटना ड्रग इंटरअॅक्शन म्हणजे औषधांच्या परस्पर पूरक अथवा प्रतिबंधक क्रियेमुळे घडलेली असते. अशा वेळी अशा शक्यता विचारात घेऊनच संबंधित चिकित्सकाने औषधाचे प्रमाण कमी जास्त करावयाचे असते. पण अशा प्रकारच्या क्रियांचे रूग्णाला सोडा पण डॅाक्टरांना सुद्धा अपवादानेच ज्ञान असते. अशा अज्ञानाचे एकमेव कारण आयुर्वेदिक औषधे निरूपद्रवी असतात हा सार्वत्रिक दृढ गैरसमज.
कॅन्सर
आणि आयुर्वेद
कधीही बरे न होणारे रोग म्हणून ज्या रोगांचा वरती उल्लेख केला आहे त्यात कॅन्सरच्या चिकित्सेसाठी आयुर्वेदाकडे वळलेल्या लोकऺाची संख्या लक्षणीय असते. कॅन्सर चिकित्सा कितीही सुधारलेली असली तरी कांही निवडक प्रकार वगळता इतर प्रकारचे कॅन्सर बरे होण्यातले नाहीत. त्यामुळे जवळपास प्रत्येक कॅन्सरचा रूग्ण चिकित्सेच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कुठल्या ना कुठल्या आयुर्वेद डक्टरला भेट देतोच देतो. अशा रूग्णांना भ्रमित करण्यात कॅन्सर बरे करण्याची हमी देणा-या बेकायदेशीर भडक जाहिराती, मित्रमंडळी आणि सग्यासोय-यांचे अनाहुत सल्ले आणि समाज माध्यमावरून प्रसारित होण-या फुकट सल्ल्यांचा हमखास हातभार लागतो. अशा वेळी तो रूग्ण आयुर्वेदाबरोबरच अॅलोपॅथिचेही कॅन्सरचे सखोल ज्ञान बाळगणा-या आयुर्वेद डॅाक्टरकडे पोंचला असेल तर त्याचे नशीब. अन्यथा त्याच्या पदरी निराशा येणे
ठरलेलेच आहे. अशा प्रकारचे ज्ञान बाळगणारे आयुर्वेद तज्ञ संख्येने कमी असले तरी नक्की उपलब्ध आहेत. वास्तविक कॅन्सरच्या चिकित्सेसाठी चिकित्सेच्या कोणत्याही टप्प्यावर आयुर्वेद डॅाक्टरकडे जाताना रूग्णांनी व त्या रूग्णाची चिकित्सा करणा-या आयुर्वेद डॅाक्टरांनी अपवाद वगळता हा रोग कधीही बरा होणारा नाही हे लक्षांत ठेवलेच पाहिजे. अशा वेळी आयुर्वेद डॅाक्टरांची भूमिका अधिक महत्वाची आहे. आयुर्वेद डॅाक्टरांनी कॅन्सर रूग्णाची चिकित्सा करताना तो बरा होणारा नाही हे रूग्णाला स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते. या बाबतीत अॅलोपॅथिक कॅन्सर तज्ञांचा आदर्श आयुर्वेद डॅाक्टरांनी समोर ठेवायला हवा. कोणताही अॅलोपॅथिक कॅन्सर तज्ञ कॅन्सर रूग्णाला कॅन्सर त्याचे शरीर पूर्णपणे सोडून जाईल व तो खडखडीत बरा होईल असे कधीच सांगत नाही. उलट विशिष्ट प्रकारची चिकित्सा घेतल्यास संबंधित रूग्ण अमुक इतके दिवस, महिने वा वर्ष जिवंत राहण्याची अमुक टक्के शक्यता आहे असे तो सांगत असतो. त्याच बरोबर कोणत्या प्रकारची चिकित्सा घेतल्यास किती खर्च येईल याचीही स्पष्ट कल्पना रूग्णाला दिली जात असते. सामान्यतः कॅन्सरची चिकित्सा करताना रूग्णाचे उरलेले आयुष्य कमीत कमी वेदनादायी व शक्य तितके सुसह्य होईल याचाच प्रयत्न कॅन्सर चिकित्सक तज्ञ करीत असतात. कॅन्सर रूग्णाची चिकित्सा करणा-या प्रत्येक आयुर्वेद डॅाक्टरचीही हीच भूमिका असली पाहिजे. परंतु असे अभावानेच होताना आढळते. कॅन्सरग्रस्त रूग्णांना आयुर्वेदिक औषधांनी तो कॅन्सरमुक्त होईल या भ्रमांत ठेवण्याच्या घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. अनेकदा कॅन्सर रूग्णऺाच्या या भ्रमाच्या पडद्याखाली अत्यंत महागडी औषधे भरमसाट फी आकारून रूग्णांच्या गळ्यात मारली जात असतात. अशा प्रकारच्या औषधांची परिणामकारकता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धही झालेली नसते. तसेच आयुर्वेद तज्ञ ज्यांना प्रमाण मानतात त्या संहिता ग्रंथातही तसा कांही ठोस उल्लेख असत नाही. त्यातच सामान्यतः कॅन्सरमध्ये यकृताची कार्यक्षमता ब-याच प्रमाणात कमी झालेली असते. अशा अवस्थेत कॅन्सरमध्ये यकृताच्या कार्यक्षमतेवर अवलंबित औषधांचा वापर शक्यतो टाळला वा कमी केला जात असतो. अशा अवस्थेत शरीरातील औषधी कार्यासाठी आणि त्यांच्या निष्कासनासाठी यकृतावलंबी औषधे कॅन्सर रूग्णाला धोकादायक ठरून त्याचे आयुष्य अपेक्षेपेक्षा लवकर संपवू शकतात. तरीही आयुर्वेदिक डॅाक्टर अशा औषधांच्या कॅन्सर वरील उपयुक्ततेची खात्री देऊन त्याचे गुणगाण गात असलेले दिसून येतात. या गोष्टीचे भान ठेवून कॅन्सरची योग्य आयुर्वेद चिकित्सा करणारे आयुर्वेद तज्ञांचे सन्माननीय अपवाद निश्चितच कार्यरत आहेत. कॅन्सर रूग्णांना आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सरमुक्तिची फसवी स्वप्ने दाखवणा-या पानभर पसरलेल्या जाहिराती नामांकित दैनिकातून हल्ली नियमितपणे पहायला मिळत आहेत. वास्तविक अशा प्रकारच्या जाहिराती करणे वैद्यकीय आचार संहितेचा भंग करणारे आहे. या आचार संहिता भंगावर संबंधित वैद्यकीय परीषदा कायदेशीर कारवाई करू शकतात. पण या परीषदांकडून अशा प्रकारची कारवाई झाल्याचे कधी ऐकीवात येत नाही.
आयुर्वेद व
अॅलोपॅथिक
तज्ञांचा समन्वय आदर्श परिस्थिती
कॅन्सर रूग्णाची चिकित्सा अॅलोपॅथिक व आयुर्वेद तज्ञांनी एकत्र येऊन करणे ही आदर्श परिस्थिती आहे. पण अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी उभयतांमध्ये विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अॅलोपॅथिक तज्ञाकडे आयुर्वेदाचे प्राथमिक ज्ञानही असण्याची अपेक्षा बाळगणे हे स्वप्नवत आहे. त्यामुळे अॅलोपॅथि तज्ञाने आयुर्वेदाचा टोकाचा विरोध वा द्वेष न करता त्याच्या रूग्णाची चिकित्सा करणा-या आयुर्वेद चिकित्सकावर विश्वास ठेवावा एवढेही पुरेसे आहे. अॅलोपॅथि व आयुर्वेदाच्या सामंजस्यपूर्ण समन्वयी आदर्श परिस्थितीमध्ये सहभागी होणा-या आयुर्वेद तज्ञाची जबाबदारी मात्र खूपच वाढलेली असते. अशा वेळी त्याच्याकडे कॅन्सर या रोगाचे अॅलोपॅथिचे अद्ययावत ज्ञान असणे ही मूलभूत गरज आहे. तसेच जी आयुर्वेदिक औषधे देण्याचे योजले जात आहे त्याची अॅलोपॅथि तज्ञाला त्याला समजेल त्या भाषेमध्ये योग्य ती माहिती आयुर्वेद तज्ञाने करून देणेही आवश्यक असते. असे झाले की कॅन्सर रूग्णाला त्याचा निश्चितपणे फायदा मिळू लागतो. अशी परिस्थिती हल्ली कांही रूग्णालयांत पहायला मिळते आहे. आणि तिचे अतिशय उत्साहवर्धक परिणाम पहायला मिळू लागले आहेत.
कॅन्सर वा अन्य कोणत्याही व्याधीने पीडित रूग्ण जेंव्हा अॅलोपॅथि औषधा सोबतच आयुर्वेदिक औषध घेत असतात तेंव्हा अशा औषधांविषयीची त्यांच्या अॅलोपॅथि आणि आयुर्वेद चिकित्सकांची अनभिज्ञता आणि अज्ञान संबंधित रूग्णासाठी घातकच ठरत असते. अॅलोपॅथि व आयुर्वेद औषधे एकत्र घेणा-या बहुसंख्य रूग्णाबाबतीत आज नेमके हेच दिसून येत आहे. त्यामुळे आयुर्वेद चिकित्सा घेऊ इच्छिणा-या अशा रूग्णांनी त्यांच्या अॅलोपॅथि डॉक्टरला याबाबत अंधारात ठेवता कामा नये. त्याच प्रमाणे अशा रूग्णांची चिकित्सा करणा-या आयुर्वेद डॉक्टरांनीही स्वतः पुढाकार घेऊन संबंधित रूग्णाची चिकित्सा करणा-या अॅलोपॅथि तज्ञाशी संपर्क साधून समन्वयाने चिकित्सा योजना करणे आवश्यक आहे. संबंधित अॅलोपॅथि तज्ञानेही अहंकार बाजूला ठेऊन याबाबत सहकार्याची भावना ठेवणे अंतिमतः रूग्णाच्या हिताचे ठरेल. आणि रूग्णहित हेच वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय असले पाहिजे मग ते कुठल्या चिकित्सा पद्धतीने साधले जाते ही बाब गौण आहे.
.......................................................................................-------------------------
डॉ. श्रीराम सावरीकर
एम
डी (आयु), पीएच. डी.
आयुर्वेद
प्राध्यापक व गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू
भारत
सरकारचे माजी आयुर्वेद सल्लागार
भारत
सरकारच्या आयुर्वेद फार्माकोपिया समितीचे माजी अध्यक्ष
प्रकाशित साहित्य
1. रसचंडांशु - हिन्दी टीका
2. शारंगधर संहिता - इंग्रजी टीका - तीन खंड
3. अर्वाचीन आयुर्वेदायन - मराठी -
आयुर्वेदाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे पुस्तक
4. आयुर्वेद - फाउंडेशन ऑफ हेल्दी लाईफ - इंगंजी
5. वैद्यकीय सऺाख्यिकी शास्त्र- हिन्दी
राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय संशोधन
पत्रिकातून संशोधनात्मक लेख प्रसिद्ध

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा